यूपीएससी : तयारीचा प्रारंभ


परीक्षेचा अभ्यास प्रत्यक्ष सुरू करण्यापूर्वी काही प्राथमिक स्वरूपाची तयारी करणे अत्यावश्यक आहे.
                      यूपीएससी परीक्षा देण्याचे निश्चित केल्यानंतर अभ्यासाच्या नियोजनाच्या दृष्टीने मूलभूत तयारी करणे क्रमप्राप्त ठरते. या प्राथमिक तयारीतील विविध टप्प्यांची ओळख करून घेऊयात..  यूपीएससी परीक्षेच्या तयारीच्या प्रक्रियेची चर्चा प्रारंभापासून करणे उपयुक्त ठरते. या परीक्षेचा अभ्यास प्रत्यक्ष सुरू करण्यापूर्वी काही प्राथमिक स्वरूपाची तयारी करणे अत्यावश्यक आहे. याला यूपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीची जुळवाजुळव असेही म्हणता येईल आणि पुढील मुद्दय़ांच्या आधारे ही पूर्वतयारी करता येणे सहजशक्य आहे.
यूपीएससी परीक्षेचे स्वरूप जाणून घ्या
.
यूपीएससी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांने सर्वप्रथम या परीक्षेचे स्पर्धात्मक स्वरूप सविस्तरपणे जाणून घेणे आवश्यक आहे. या परीक्षेत पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत (अर्थात व्यक्तिमत्त्व चाचणी) अशा तीन वेगळ्या टप्प्यांचा समावेश असतो. यातील पूर्वपरीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची, बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित आणि नकारात्मक गुणपद्धत असलेली आहे
.
पूर्वपरीक्षेचा हा प्राथमिक टप्पापात्रता चाचणीस्वरूपाचा आहे. म्हणजेच या परीक्षेत प्राप्त होणारे गुण या टप्प्यापुरतेच ग्राह्य़ धरले जातात. यात पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा परीक्षेचा पुढील प्रवास सुरू होतो. वस्तुनिष्ठ नकारात्मक गुणपद्धतीमुळे विद्यार्थ्यांनी नेमकेपणाने आणि अचूक अभ्यास करणे अत्यावश्यक आहे. मूलभूत संकल्पना समजून घेणे, आवश्यक माहितीचे पुन:पुन्हा वाचन करणे, अभ्यास पक्का करणे, स्मरणशक्तीचा विकास करणे, प्रश्नाखालील चुकीचे पर्याय वगळून योग्य पर्यायाकडे जाण्याचे कौशल्य या आधारेच यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेत यश संपादन करणे शक्य होते. थोडक्यात, पूर्वपरीक्षेचे स्वरूप लक्षात घेता सुरू केलेला अभ्यास पुरेसा ठरणार नाही, हे लक्षात घेऊन आपल्या अभ्यासाचे धोरण निश्चित करावे
.
मुख्य परीक्षा लेखी स्वरूपाची असते. हे लक्षात घेत अभ्यासात आवश्यक ते बदल करणे निकडीचे ठरते. व्यक्तिमत्त्व चाचणीच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. उमेदवाराने आयोगाकडे पाठवलेली व्यक्तिगत माहिती, वैकल्पिक विषय, चालू घडामोडी आणि नागरी सेवेविषयी काही मूलभूत प्रश्न या अनुषंगाने मुलाखतीत प्रश्न विचारले जातात. मुलाखत ही संवादाच्या स्वरूपातील तोंडी परीक्षा असल्यामुळे सदस्यांनी विचारलेले प्रश्न व्यवस्थितपणे ऐकून समजून घेणे, त्याविषयी आपले मत योग्य रीतीने मुलाखत मंडळासमोर मांडणे, आपल्या आवाजाचा पोत पातळी योग्य राखणे, औपचारिक भाषेचा वापर करणे, देहबोली आत्मविश्वासपूर्वक असणे, तसेच संभाषणात आवश्यक ती औपचारिकता राखणे या सर्वाचे भान ठेवणे गरजेचे आहे. मुलाखतीच्या स्वरूपानुसारच आपल्या तयारीला दिशा द्यावी लागते. म्हणजेच प्रत्येक टप्प्याचे वेगळेपण लक्षात घेऊन त्या प्रकारची अभ्यासपद्धतीचा अवलंब करावा लागतो.

Post a Comment

0 Comments

Close Menu